>> मंगेश मोरे
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावली आणि अभिषेक यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने आज निकाल जाहीर केला. या निकालाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक बसली आहे.
अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. योग्य तपास करण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करीत अभिषेक यांच्या पत्नी, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी फौजदारी रिट याचिका केली होती. या याचिकेवर आज निकाल जाहीर केला. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजून मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी- सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केलेला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. असे असताना पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले, याकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
राजकीय आश्रय असलेल्या आरोपींची पाठराखण
तेजस्वी यांनी याचिकेत अनेक गंभीर दावे केले होते. अभिषेक यांच्या हत्येच्या कटात अमरेंद्रकुमार मिश्रा, मेहुल पारेख, संजय आचार्य यांचा सहभाग असण्याबरोबरच अज्ञात सूत्रधार आहेत. त्या सूत्रधारांचा चेहरा वेळीच उजेडात आणण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे. राजकीय आश्रय असलेल्या आरोपींची पोलिसांकडून जाणूनबुजून पाठराखण केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यांनी याचिकेतून केला होता.