एसी लोकलमुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढली! पुन्हा तीच गर्दी, तीच रेटारेटी… आरामदायी प्रवासाचा हिरमोड 

उपनगरी रेल्वे मार्गावरील एसी लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी बनण्याऐवजी डोकेदुखी वाढली आहे. एसी लोकलच्या नियमित प्रवाशांना तीच गर्दी, तीच रेटारेटी आणि तीच धक्काबुक्की सोसत रेल्वे प्रवास करावा लागत आहे. एसी लोकलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने कामावर ‘लेटमार्क’ लागत आहे. आरामदायी प्रवासाबाबत रेल्वेचे नियोजन चुकल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंब्रा येथील अपघातानंतर लोकलच्या गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजाच्या लोकल आणण्याच्या तसेच अतिरिक्त 238 एसी लोकल सेवेत दाखल करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. मात्र सध्या धावत असलेल्या एसी लोकलच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या मध्य रेल्वेवर एसी लोकलचे एकूण सात रेक आहेत. त्यांच्या माध्यमातून दररोज 80 फेऱ्या चालवण्यात येतात. 2023 मध्ये एसी लोकलचा प्रवास करणाऱ्यांची संख्या 2.09 कोटी होती. त्यात 2024 मध्ये 2.84 कोटींपर्यंत वाढ झाली. सध्या नियमित प्रवाशांची सरासरी संख्या 78,000 इतकी आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 109 फेऱ्या चालवण्यात येत आहेत. पीक अवर्सला नोकरदार मंडळी एसी लोकलला प्राधान्य देत आहेत. मात्र सामान्य लोकलच्या तिकिटापेक्षा अनेक पटीने पैसे मोजूनही तीच गर्दी सोसावी लागत आहे. त्यात एसी लोकलची योग्य देखभाल ठेवण्यातही रेल्वे प्रशासनाचे अपयश उजेडात येत आहे.

‘लटकंती’ टाळण्यासाठी एसी लोकलला पसंती

एसी लोकलला स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे प्रवासी खाली पडण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे अनेक प्रवासी एसी लोकलकडे वळले आहेत. मात्र वारंवार एसी लोकल रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मध्य रेल्वेवर गेल्या आठवडय़ात सलग दोन दिवस एसी लोकलच्या 12 फेऱ्या रद्द केल्या.

मी दररोज एसी लोकलमधून कल्याण येथून सीएसएमटीपर्यंत प्रवास करतो. आमची लोकल डाऊन मार्गावर असताना डोंबिवलीवरून भरून येते. त्यामुळे कल्याणच्या प्रवाशांना आत शिरणे मुश्कील होते. गर्दी इतकी प्रचंड असते की, दादर स्थानक आल्यानंतर बसण्यास सीट मिळते. दरमहा 2135 रुपये मोजूनही आरामदायी प्रवास करता येत नाही.
– एकनाथ ढोकळे, वकील, उच्च न्यायालय

रद्द फेऱ्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी

एसी लोकलच्या फेऱ्या वारंवार रद्द केल्या जात असल्यामुळे पासधारक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिनाभरात एसी लोकलच्या जेवढय़ा फेऱ्या रद्द केल्या जातात, त्या सर्व फेऱ्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आरामदायी व सुरक्षित प्रवासाच्या आशेने एसी लोकलमधून नियमित प्रवास करतो, परंतु गेल्या काही महिन्यांत आरामदायी प्रवासाचा पुरता हिरमोड झाला आहे. एसी लोकल अनेकदा कुठलेही कारण वा उद्घोषणा न करताच रद्द केल्या जातात. एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीचे प्रमाण कमी झाल्यामुळे फर्स्ट क्लास व जनरल डब्यातील प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे.
-रामदास शेळके, नियमित प्रवासी, डोंबिवली