
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका पोलीस निरीक्षकासह ठाणे अंमलदाराला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सापळा कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली.
मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार रवी गणपत जाधव आणि पोलिस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे मासिक हप्ता म्हणून 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 10 हजार रुपये आधीच घेतले होते, तर उर्वरित रक्कम देण्यास सांगितले होते. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
पडताळणीदरम्यान आरोपी रवी जाधव याने तक्रारदाराच्या टिप्परवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयांसह आणखी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलिस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनीही या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले. पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांनी अवैध वाळू वाहतुकीच्या दोन गाड्या पकडून दिल्यास तक्रारदाराला एका गाडीच्या मासिक हप्त्यात सूट देण्याचे आमिष दाखवून लाचेची मागणी केल्याचेही समोर आले आहे. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
लाच मागणी पडताळणीनंतर पोलिस अंमलदाराने रात्रीच गाडी सोडून देण्यासाठी 10 हजार रुपये घेतल्याचं समोर आले. नंतर उर्वरित 40 हजार रुपयांच्या लाच रकमेत तडजोड करून 30 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रवी जाधव याला मंठा पोलिस स्टेशनमधील गोपनीय शाखेत पंचांसमक्ष रंगेहात पकडले. या कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रवी जाधव यांच्या झडतीत 30 हजार रुपयांची लाच रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलिस निरीक्षक मनोज राठोड यांच्या ताब्यातील मोबाईलही जप्त करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू हे. या प्रकरणात आरोपींनी तक्रारदाराच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी एकूण 55 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारले, असेही तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर पुढील तपास करत आहेत.






























































