
वाहनांची सतत गर्दी असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर आज सकाळी विचित्र अपघात झाला. एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि आठ वाहने एकमेकांवर आदळली. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून या अपघातात नेमकी कुणाची चूक आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर गाड्या आदळून अपघात झाल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहतूककोंडी झाली होती. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे अपघात यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
मुलुंड टोलनाक्यावर रोज सकाळी व संध्याकाळी कामावर जाणाऱ्यांची गर्दी असते. त्यात आज अपघाताची भर पडली. कारचाल काने ब्रेक दाबताच सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचा मागील व पुढील भाग चेपला गेला. काही गाड्यांच्या काचा फुटल्या. अपघाताचे वृत्त समजताच वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र तोपर्यंत वाहनचालक व प्रवाशांची चांगलीच रखडपट्टी झाली.