
महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशमधील गाझीपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. गोरखपूर-वाराणसी महामार्गावर एका कारला वाचवताना भाविकांची बस उलटून झालेल्या या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. यातील एक महिला बुलढाणा, तर दुसरी अकोला जिल्ह्यातील रहिवासी होती. दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाझीपूरचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार आणि पोलीस अधीक्षक इराज राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या दोन्ही महिलांची ओळख पटली आहे. अन्नपूर्णाबाई (वय – 50, रा. अकोला) आणि सरस्वती पाखरे (वय 70, रा. बुलढाणा) अशी या मृत महिलांची नावे आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 48 भाविक उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक यात्रेसाठी गेले होते. सुरुवातीला त्यांनी अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर वाराणसी येथे काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन भाविकांची बस नेपाळच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गोरखपूर-वाराणसी महामार्गावर नदगंज पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या नवसारा भागात समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला धडकून उलटली.
या भीषण अपघातामध्ये दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला, रत 35 जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या 35 जणांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 32 जणांची प्रकृती स्थिर असून, 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या गंभीर जखमींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. त्यानंतर नंदगंज पोलीस आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून अपघातामागील कारणांचा तपास सुरू आहे.



























































