परीक्षेच्या दिवशीच निघाली त्याची अंत्ययात्रा

37

उल्हासनगर – बारावीचे वर्ष असल्याने त्याने जोरदार तयारी केली होती. चांगल्या मार्कांनी पास व्हायचे आणि आयुष्यात मोठी झेप घ्यायची, अशी स्वप्ने त्याने पाहिली होती, पण बारावीचा पहिला पेपर देण्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली. परीक्षेचे टिपण आणण्यासाठी मित्राकडे गेलेल्या अनिरुद्ध शंभरकर याचा सोमवारी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. एकीकडे सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षेला जाण्यासाठी धावपळ सुरू असताना दुर्दैवी अनिरुद्धची अंत्ययात्रा निघाली होती.

उल्हासनगरातील कॅम्प-चार मधील गुरुनानक चौकात असणाऱ्या करुणा अपार्टमेंटमध्ये राहणारा अनिरुद्ध अशोक शंभरकर (१८) हा विद्यार्थी चांदीबाई कॉलेजमध्ये बारावीतील वाणिज्य शाखेत शिकत होता. मंगळवारपासून परीक्षेस सुरुवात होत असल्याने काल सोमवारी अनिरुद्ध याने सायंकाळी चार वाजता होली फॅमिली शाळेतील केंद्र बघितले आणि बदलापुरात राहणाऱ्या मित्राकडे टिपण घेण्यासाठी गेला. मात्र रात्री ९च्या सुमारास अनिरुद्ध हा अंबरनाथहून बदलापूरकडे येत असताना लोकलमधून पडला. या दुर्घटनेत जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

बाबा, मी लोकलमधून पडलोय!

लोकलमधून पडलेल्या अनिरुद्धला सुरुवातीला शुद्ध होती. त्याने रक्ताच्या थारोळ्यातच मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क साधला. बाबा, मी लोकलमधून पडलोय, असे वेदनेच्या आकांतानाच तो शेवटचा पुटपुटला. या फोनने हादरलेल्या घरच्यांनी स्थानिक पोलीस व रेल्वे पोलिसांच्या मदतीने अनिरुद्धचा शोध घेतला.

पहाटे तीन वाजता सापडला मृतदेह

चार ते पाच तासांच्या शोधानंतर अंबरनाथ ते बदलापूरच्या दरम्यान रेल्वे रुळालगत एका नाल्यातील झुडपात अनुरुद्धचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या