जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी जहागीरदारची हत्या

श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह गंभीर गुह्यांतील आरोपी आणि सध्या जामिनावर असलेला बंटी उैर्फ अस्लम शबीर जहागीरदार याच्यावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने सहा गोळय़ा झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी बंटी जहागीरदारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कब्रस्तानातील एका अंत्यविधीला उपस्थित राहून बंटी जहागीरदार हा मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी चालला होता. सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ पोहोचताच, दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना, पायाला, पाठीला तसेच कानाजवळून एक गोळी गेली. एकूण सहा गोळय़ा झाडण्यात आल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.