
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रपतींनी आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यानुसार आचार्य देवव्रत यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या शपथविधी सोहळय़ाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.