
वडगाव पान येथील एका 13 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थिनी आणि युवकांनी एकत्र येत तळेगाव फाटा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी “संगमनेर तालुक्यात चाललंय काय?” असा संतप्त सवाल उपस्थित करत, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने कडक कायदे करावेत, अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, एका चिमुकलीवर झालेला हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे. प्रशासनाने या घटनेतील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याला अशी कठोर शिक्षा करावी, जेणेकरून भविष्यात कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही. गेल्या काही दिवसांत पठार भागात एका युवतीवर चाकू हल्ला झाला आणि आता हा ॲसिड हल्ला, या घटना सुसंस्कृत संगमनेर तालुक्यासाठी चिंताजनक आहेत.
पीडित मुलीच्या प्रकृतीबाबत बोलताना डॉ. थोरात यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “प्रवरा रुग्णालयात जाऊन मी त्या मुलीची भेट घेतली. तिचा चेहरा आणि डोळे गंभीररीत्या भाजले असून ती प्रचंड वेदनेत आहे. ती लहान मुलगी सध्या बोलण्याच्या स्थितीतही नाही. समाज म्हणून आपण जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी आणि ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढवावी,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



























































