
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांच्या डब्यात घुसखोरी सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून सुदृढ महिलांचाही प्रवास वाढला असल्याने ठाणे आरपीएफ जवान आणि रेल्वे टीसी यांनी आज एकतरी कारवाई केली. 10 ते 12 लोकल गाड्यामधून जवळपास 50 महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, गैरपद्धतीने प्रवास करणाऱ्यांना आता तरी लगाम लागणार का? असा सवाल दिव्यांगांनी केला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या लोकलमधील व्हिडीओ एका अज्ञात दिव्यांग व्यक्तीने आज सकाळी काढला. तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही सुदृढ प्रवासी दिव्यांगांच्या डब्यातून गैरपद्धतीने प्रवास करीत असल्याचे उघडकीस झाले. गर्दीच्या वेळी नियमांची पायमल्ली करीत दिव्यांगांच्या राखीव असलेल्या डब्यात सुदृढ महिला सर्रासपणे प्रवास करीत असल्याचे समोर आले. दरम्यान, आज सकाळच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या बेधडक कारवाईचे दिव्यांगांनी स्वागत केले आहे.