
प्रसिद्ध बॉलीवूड-टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांना तीव्र न्यूमोनियाचा त्रास होता. मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियामुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही.
नवी मुंबईतील खारघर परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिराच्या उद्घाटन समारंभात ते सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाने मंनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. धीरज कुमार जी यांच्या निधनाने आम्हाला दुःख झाले आहे. ते 1970 पासून CINTAA चे आदरणीय सदस्य आहेत. त्यांचे योगदान आणि उपस्थिती आम्हाला नेहमीच आठवेल. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना आमच्या संवेदना. ओम शांती., अशा भावना CINTAA ने व्यक्त केल्या आहेत.
धीरज कुमार यांनी 1965 मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. ते एका टॅलेंट शोचे फायनलिस्ट होते ज्यामध्ये त्यांच्यासोबत सुभाष घई आणि राजेश खन्ना देखील होते. राजेश खन्ना त्या शोचे विजेते ठरले. त्यांनी 1970 ते 1984 दरम्यान 21 पंजाबी चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला. त्यानंतर त्यांनी ‘हीरा पन्ना’, ‘रतों का राजा’, ‘सरगम’, ‘बहरूपिया’, ‘रोटी कपडा और मकान’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टेलिव्हिजनच्या जगातही उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी ‘ओम नमः शिवाय’, ‘कहां गये वो लोग’, ‘अदालत’, ‘ये प्यार ना होगा काम’, ‘सिंघासन बत्तीसी’ आणि ‘मैका’ असे लोकप्रिय शो दिले आहेत. रिअॅलिटी शोद्वारे मनोरंजन क्षेत्रात सहभागी झालेल्या धीरज कुमार यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ ही निर्मिती कंपनी देखील सुरू केली. ते कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.