दुबईत अडकलेली अभिनेत्री लारा दत्ता अखेर हिंदुस्थानात परतली, तिथल्या भीषण परिस्थितीबाबत केले भाष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर, दुबई कतारसह अनेक मध्यपूर्व देशांतील परिस्थिती नाजूक बनली. या पार्श्वभूमीवर दुबई येथे बरेचसे हिंदुस्थानी अडकले होते. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील तिची 14 वर्षांच्या मुलगी सायरासोबत दुबईमध्ये अडकली होती. मात्र धोकादायक प्रवासानंतर त्या दोघी आता सुरक्षितपणे मायदेशी परतल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी लारा दत्ताने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये दुबईतील परिस्थितीबद्दल ती चिंतेत दिसत होती. स्फोटांचे आवाज आणि आकाशात फिरणाऱ्या फायटर जेट्समुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. मुलगी सायराच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने लाराला त्या परिस्थितीचा मोठा ताण जाणवत होता. तरीही तिने दुबईतील सुरक्षा अधिकाऱ्यांचे कौतुक केले, कारण त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीतही नागरिकांची सुरक्षितता राखण्याचा प्रयत्न केला.

माध्यमांशी बोलताना लारा दत्ताने सांगितले की, युद्ध सुरू झाले तेव्हा ती आणि तिची मुलगी दुबईमध्ये एकट्याच होत्या. तिचे पती माजी टेनिसपटू महेश भूपती त्या वेळी लंडनमध्ये कामानिमित्त होते. लाराने सांगितले की त्या जेबेल अली पोर्टपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर राहत होत्या आणि त्या परिसरात दररोज बॉम्बहल्ले होत होते. त्यामुळे धोका पत्करून दुबई सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

लाराने सांगितले की, त्यांनी सुमारे दोन तासांचा प्रवास करून फुजैराह येथे पोहोचल्या. मात्र त्याच्या एक दिवस आधीच फुजैराह पोर्ट आणि तेथील ऑइल रिफायनरीवर हल्ले झाले होते.
“खूप भीती वाटत होती, हे मी नाकारू शकत नाही. मी माझ्या सहकलाकार अक्षय कुमारला मजेत सांगत होते की जणू आपण एअरलिफ्ट-२ च्या शूटिंगमध्ये आहोत,” असे लाराने सांगितले. तिने सांगितले की विमानतळावर असताना देखील स्फोटांचे आवाज ऐकू येत होते आणि आम्ही सुरक्षित पोहोचण्यासाठी सतत प्रार्थना करत होतो.

लाराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओबद्दलही स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली की तो व्हिडिओ वैयक्तिक कारणांमुळे पोस्ट केला होता. “माझ्यासाठी हा खूप धोकादायक प्रवास होता आणि पुढे काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. माझ्या मनात 1 टक्के विचार होता की कदाचित हा माझ्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ ठरू शकतो,” असे तिने सांगितले.