
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात ‘अदानी’कडून आता संख्याशास्त्र आणि पायाभूत सुविधांबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उत्थान’ उपक्रमात पालिका आणि अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या उपक्रमात पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र बळकट करण्यासाठी महानगरपालिकेच्या 947 शाळांमध्ये प्रकल्प राबविला जाणार असून दीड लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या शिक्षण विभागाने जानेवारी-एप्रिल 2025 मध्ये इयत्ता दुसरीच्या सर्व 31000 विद्यार्थ्यांचा समावेश करून प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प राबवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात लक्षणीय प्रगती दिसून आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा 2025-26 ते 2027-28 या तीन शैक्षणिक सत्रांसाठी आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता विस्तार करण्यात आला आहे.