वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीच्या मतदार यादीतून पत्ते, फोटो गायब; तातडीने याद्या दुरुस्त करण्याची शिवसेनेची मागणी

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आणि प्रभागनिहाय मतदार याद्या पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. मतदार याद्या सदोष असून वसई-विरार तसेच कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अनेक प्रभागामधील यादीतील मतदारांचे पत्तेच गायब आहेत. याशिवाय नावासमोर फोटो नसणे, दुबार नावे अशा त्रुटी आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली.

वसई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विरार येथील पदाधिकाऱ्यांनी आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या निदर्शनास आणून दिला. तातडीने याद्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने केली. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकून संभ्रम निर्माण केलेला आहे. यादीत अनेक मतदारांचे फोटो नसून दुबार मतदार संख्येत लक्षणीय वाढ आहे. बऱ्याच ठिकाणच्या यादीत मतदारांचे पत्तेच नाहीत. त्यामुळे शिवसेना उपतालुकाप्रमुख नरेश वैद्य, शहरप्रमुख विवेक पवार, शहर सचिव विनायक नांदवीकर, उपशहर प्रमुख राहुल फडतरे, विभागप्रमुख संदीप कदम, सुनील पेडणेकर, गणेश भुवड, विजय जाधव, विशाल जाधव, संदीप करकरे, संजय वाईरकर यांनी पुराव्यांसहित पालिकेकडे तक्रार केली आहे.

डोंबिवली – केडीएमसीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेनेच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेचे उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर भूमकर यांची भेट घेतली. केडीएमसी क्षेत्रात वास्तव्यास नसलेले, तसेच ठाणे, नवी मुंबईतील आणि ग्रामिण भागातील मतदारांची नावे केडीएमसीच्या मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. चुकीची नावे वगळून यादी अद्ययावत करावी, अशी मागणी कल्याण जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, योगेंद्र भोईर, भय्या पाटील, परेश पाटील, मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव, विभागाध्यक्ष रक्षीक गायकर यांनी केली.