शिक्षण मंत्र्यांना पदावरून हटवा, आदित्य ठाकरे यांची जोरदार मागणी

देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंह राव 14 भाषा बोलायचे. त्यांना या भाषा शिकण्यासाठी सक्तीच्या शाळेत पाठवण्यात आले नाही, मग राज्याचे सरकार महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का केली जात आहे, असा सवाल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. याला जबाबदार असणारे अकार्यक्षम शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पदावरून हटवा, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर हिंदीसक्तीविरोधात शिवसेनेने 5 जुलै रोजी आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनाला पाठिंबा देत मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठी साहित्य महामंडळाचा पाठिंबा

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा. जोशी म्हणाले, मुंबईत 5 जुलै रोजी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्था व साहित्यिकांनी मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या भूमिकेतूनच साहित्य महामंडळ या मोर्चात सहभागी होत आहे. महाराष्ट्रातील भाषा व साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि मराठीप्रेमींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यासाठी शिवसेना नेते – आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी विलेपार्ले येथे राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रूपाली शिंदे, प्रकाश सकपाळ, अनिल मालप, अपर्णा उतेकर, आनंद पाठक, अस्मिता सावंत, वैभव सावंत उपस्थित होते.

भीमसैनिक संघटनेचा जाहीर पाठिंबा

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाला भीमसैनिक संघटनेने पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र शिवसेना भवन येथे शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव राजेश कुचिक यांच्यासह भीमसैनिक संघटनेचे अध्यक्ष सुशांत दोडमणी, प्रशांत जाधव, किशोर गायकवाड, गणेश साठे, रहिमा सिद्दिकी, आम्रपाली देवेंद्र, राजेश भोजने, सुनील खंडागळे, विशाल जाधव उपस्थित होते.

समाजवादी पक्षाचाही हिंदी सक्तीला विरोध

हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी घेतली आहे.

नाशकात शिवसेनेकडून निषेध

शिवसेना पक्षाच्या वतीने उद्या रविवारी हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून महायुती सरकारचा निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली. महायुती सरकार पहिलीपासून हिंदी सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचे धोरण राबवत आहे, याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रविवारी दुपारी शिवसेना निषेध आंदोलन करणार आहे.

रत्नागिरीत आंदोलन

पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने उद्या रविवार दि. 29 जून रोजी दुपारी 3 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे. गुजरात राज्यात हिंदी भाषेची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती कशाला, असा सवाल शिवसेना उपनेते बाळ माने यांनी उपस्थित केला आहे.