
तालिबान सरकारने मोठय़ा प्रमाणात कालवे आणि धरणे बांधण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानला स्वतःला शेती आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे तालिबान अफगाणिस्तानचे वाया जाणारे पाणी अडवणार आहे. यामुळे आशियाई देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानला जाणार्या कुनार नदीवर अफगाणिस्तान धरणे बांधू लागला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पाणीपुरवठा आणि प्रादेशिक स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी रोखले होते. आता पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच अफगाणिस्तानकडून देखील पाण्याचे वांदे होणार आहेत. अफगाणिस्तानने इराण आणि पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तान आता आपल्या देशातील नद्या आणि कालव्यांवर नियंत्रण स्थापित करण्याची योजना आखत आहे. तालिबानने अफगाणिस्तानातून इराण आणि पाकिस्तानला वाहून जाणारे त्यांच्या देशातील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नद्या आणि कालव्यांचे पाणी स्थानिक लोकांच्या वापरासाठी अडविले जाणार आहे. यामुळे इराणसह पाकिस्तान आणि उज्बेकिस्तानच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
< उत्तर अफगाणिस्तानातील 5 लाख 60 हजार हेक्टर शेती जमिनीला सिंचन करण्यासाठी मोठा प्रकल्प उभारला जात आहे. कोश टेपा कालव्यावर हा प्रकल्प उभा राहत असून यामुळे हा अमू दर्या कालव्याचा 21 टक्के प्रवाह वळण्याची शक्यता आहे. ही नदी उझबेकिस्तान, तुर्पमेनिस्तान आणि कझाकस्तानसाठी खूप महत्वाची आहे.
< दुसरीकडे हेलमंड नदीवरून इराणमध्ये वाद आहे. दोन्ही देशांत पाणीवाटप करार झालेला आहे. परंतू, आता हवामान बदलामुळे जास्त पाणी सोडू शकत नाही, असे अफगाणिस्तानने सांगत हात वर केले आहेत.



























































