पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे जोरदार प्रत्त्युतर, सहा जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काबूल आणि कंदहार या दोन मोठ्या शहरांवर केलेल्या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचा दावा केला आहे. तालिबान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यांत सहा जणांचा मृत्यू झाला. दोन्ही शेजारी इस्लामी देशांमधील तणाव पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने या परिस्थितीला “उघड युद्ध” असेही म्हटले होते.

तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाण प्रशासनाने पाकिस्तानातील काही महत्त्वाच्या लष्करी केंद्रांवर लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाशी संबंधित समाजमाध्यमावरील एका खात्यावरून ही माहिती देण्यात आली.

या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लष्कराने रात्रीच्या वेळी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील ड्युरंड रेषेवर केलेल्या उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून अफगाण हवाई दलाने पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट परिसरातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले.

या कारवाईत कोहाट येथील लष्करी किल्ला उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्या किल्ल्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेले ड्युरंड रेषेवरील संघर्षासाठी वापरले जाणारे नियंत्रण केंद्र आणि लष्करी अधिकाऱ्यांचे कार्यालयही अचूकपणे लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याआधी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काबूल आणि कंदाहार येथे हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये काबूलमधील काही घरे उद्ध्वस्त झाली, तर कंदाहार विमानतळावरील इंधन साठा नष्ट झाल्याचेही सांगितले जात आहे. या घटनांमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.