
जपानमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणाऱया 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी हिंदुस्थान अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) कडक पात्रता निकष जाहीर केले आहेत. यंदा हिंदुस्थानच्या पुरुषांच्या 100 मीटर धावणे आणि बांबू उडी (पोल व्हॉल्ट) या स्पर्धांमध्ये स्थान मिळवण्यासाठी राष्ट्रीय विक्रम मोडणे बंधनकारक असेल, असा निर्णय एएफआयने घेतला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले, तसेच वॉकेथॉन या नव्याने समाविष्ट स्पर्धांसाठीचे पात्रता निकष पुढील टप्प्यात जाहीर केले जातील. आशियाई रिले आणि जागतिक रिले स्पर्धांनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे
निवडीसाठी खेळाडूंना राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग बंधनकारक असून एकूण तीन स्पर्धांमध्ये (दोन आंतरराज्य आणि एक राष्ट्रीय स्पर्धा) भाग घेणे आवश्यक राहील. यापैकी किमान दोन स्पर्धांमध्ये पात्रतेच्या जवळपासची कामगिरी आणि अंतिम स्पर्धेत थेट पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नीरजचे 2026 चे स्पर्धा कॅलेंडर निश्चित
दुखापतीमुळे जागतिक अजिंक्यपदाचा किताब राखता न आलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या प्रशिक्षक जॉन झेलेन्झी यांच्यासोबत 2026 सालासाठीचे स्पर्धा कॅलेंडर निश्चित केले आहे. नीरजचे संपूर्ण कॅलेंडर झेलेझ्नी यांच्याकडे आहे. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. जागतिक स्पर्धेत दोन दुखापती असूनही त्याने सहभाग घेतला होता, मात्र तो हंगामाची सुरुवात कोणत्या स्पर्धेतून करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, असेही सुमारीवाला यांनी सांगितले.



























































