
आफ्रिकेतील घाना येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पश्चिम आफ्रिकेच्या संरक्षणमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी अक्राहून ओबुआसी शहरात हे हेलिकॉप्टर चालले होते. मात्र काही मिनिटांतच अदानसी भागातील घनदाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळले. अपघातानंतर आफ्रिकन लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, Z-9 हेलिकॉप्टर अक्राहून ओबुआसीला चालले होते. या हेलिकॉप्टरमध्ये पाच सदस्य आणि तीन क्रू मेंबर्स असे एकूण आठ सदस्य होते. बुधवारी सकाळी 9.12 वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला. यानंतर हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली आणि हेलिकॉप्टरमधील आठही जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये संरक्षण मंत्री एडवर्ड ओमान बोमाह आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मुहम्मद यांच्यासह सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेसचे उपाध्यक्ष, एक सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. ओबुआसी येथे एका राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सर्वजण चालले होते.
घानाच्या सरकारने या अपघाताचे वर्णन “राष्ट्रीय शोकांतिका” असे केले आहे. अपघातग्रस्त Z-9 हेलिकॉप्टर हे बहुतेकदा वाहतूक आणि वैद्यकीय स्थलांतरासाठी वापरले जाते.




























































