
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अजितदादांचा उत्तराधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्याची मागणी जोर धरू लागली असून दोन्ही राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी अंत्यसंस्कारानंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजितदादांची पक्षावरील आणि संघटनेवरील पकड लक्षात घेता त्यांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अर्थमंत्री, बारामतीचे आमदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागा कोण भरणार, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमध्ये पक्षाची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबद्दल अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत विचारविनिमय सुरू केला आहे. सद्य परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
झिरवाळ यांच्या मागणीने चर्चांना वेग
अंत्यसंस्कारावरून परतताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी भूमिका माध्यमांपुढे मांडली. बारामतीमधील नागरिकांबरोबरच सर्वसामान्य जनतेचीही अशी इच्छा आहे की, सुनेत्रा वहिनींना आता सत्तेत आणलं पाहिजे. झिरवाळ यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली असून चर्चांना वेग आला आहे.
कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम
जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून इतक्या जवळ आल्या होत्या की, अनेक ठिकाणी उमेदवार हे घडय़ाळ चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे निवडणुका संपल्यावर काही महिन्यांतच दोन पक्ष एकत्र येण्याची अटकळ बांधली जात होती. अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये यावरून मतभेद पाहायला मिळत होते. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या या प्रक्रियेला खीळ बसते किंवा कसे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे.

























































