कोरोनानंतर आता जपानमध्ये नवा आजार; आजारामुळे होऊ शकतो 48 तासांत मृत्यू

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची दहशत अद्यापही कायम असून, यादरम्यान जपानमध्ये नवीन धोकादायक आजाराने तोंड वर काढले. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असे या आजाराचे नाव आहे. यामध्ये बॅक्टेरिया रुग्णाच्या शरीराचे मांस खाण्यास सुरुवात करतात. अहवालानुसार, या आजारामुळे ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. एकट्या जपानमध्ये आतापर्यंत ९७७ प्रकरणांची नोंद झाली असून, हा आजार ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस (जीएएस) बॅक्टेरियामुळे होतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार लहान मुले आणि ६५ वर्षांपुढील वृद्धांसाठी सर्वात धोकादायक आहे. याचा संसर्ग झालेल्या लोकांना प्रथम सूज आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. याशिवाय शरीर दुखणे, ताप, कमी बीपी, नेक्रोसिस, श्वास घेण्यास त्रास होणे, अवयव निकामी होणे यासारख्या समस्याही उद् भवतात. स्ट्रेप्टोकोकस हा आजार आता युरोपातील ५ देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये ब्रिटन, प्रâान्स, आयर्लंड, नेदरलँड आणि स्वीडन यांचा समावेश आहे. येथे या बॅक्टेरियाने मुलांवर सर्वाधिक हल्ला केला आहे. टोकियो येथील महिला डॉक्टर केन किकुची यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम रुग्णाच्या शरीरात विशेषत: पायांना सूज येते, त्यानंतर काही तासांनंतर ती संपूर्ण शरीरात पसरते. त्यानंतर ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होतो. भविष्यात जपानमध्ये दरवर्षी या आजाराची २५०० प्रकरणे येऊ शकतात, असा अंदाज आहे. डॉक्टरांच्या मते, हा आजार टाळण्यासाठी त्याची लवकर ओळख, काळजी आणि त्वरित उपचार आवश्यक आहेत. एसटीएसएसचा सामना करण्यासाठी जे-८ नावाची लसदेखील बाजारात उपलब्ध आहे, जी शरीरात प्रतिजैविक तयार करते. हा आजार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरतो.