
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर २४ तास कडेकोट वॉच ठेवला जात आहे. जिल्ह्यातील २७ संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दलाचे १ हजार २९० जवान तैनात करण्यात आले असून अहोरात्र गस्त घालत आहेत. दोन बोटींसह संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखाळी बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या आरडीएक्सचा साठा श्रीवर्धनच्या शेखाडी बंदरावर उतरवण्यात आला होता. त्यामुळे मुंबईला लागूनच असलेली रायगडची समुद्रकिनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. या स्फोटात १० निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून २० जण गंभीर जखमी झाले. यानंतर मुंबईसह सागरी किनारपट्टीवर हायअलर्ट जारी केला आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील २७ संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागरी पट्ट्यातील साळाव, मांदाड, पेझारी, म्हसळा आणि शिघ्र धरमतर या महत्त्वाच्या किनारपट्टीवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागरी सुरक्षा दलाचे तब्बल १ हजार २९० कर्मचारी तैनात करण्यात आले असून दोन गस्त बोटींच्या माध्यमातून सागरी हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.
बोंबल्या विठोबाच्या यात्रेत पोलिसांचा खडा पहारा
संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील साजगाव येथील धाकटी पंढरी म्हणजेच बोंबल्या विठोबाच्या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत पोलिसांनी ठिकठिकाणी खडा पहारा ठेवला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली आहे.
१२ ठिकाणी नाकाबंदी
सागरी सुरक्षेबरोबरच रस्ते मार्गावरही १२ ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी, प्रवाशांची चौकशी आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दल, कोस्टल पोलीस, स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून गस्त व तपासणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



























































