
कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता खुला करण्यात यावा, यासाठी शिंदेवाडी या गावातील व त्या परिसरातील ग्रामस्थांचा तब्बल शंभर वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आजअखेर संपला. रस्ता खुला झाल्याने ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. यासाठी नगरसेवक प्रा. सतीश पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी पुढाकार घेतला होता. या रस्त्याचा सहा गावांना फायदा होणार आहे.
शिंदेवाडी कर्जत ते जुना टाकळी खंडेश्वरी हा रस्ता काही शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अतिक्रमण करून अडवला होता. गट नंबर 1404, गट नंबर 1402 व गट नंबर 1403 यातील रस्ता खुला करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी येथील कित्येक पिढय़ांनी संघर्ष केला. तो आजतागायत सुरू होता. याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. न्यायालयामध्ये देखील हक्कासाठी संघर्ष सुरू होता. मात्र यश येत नव्हते.
मात्र, नगरसेवक प्रा. सतीश पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांना या रस्त्याची सर्व माहिती सांगितली. यानंतर घुले यांनी या परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये असलेले वाद मिटवत या रस्त्याचे महत्त्व सर्वांना सांगितले. त्यानंतर वरील गटांमधून बारा फुटाचा रस्ता देण्याचे ठरले आणि संबंधित सर्व शेतकऱ्यांनी हा निर्णय मान्य केला. त्यानंतर लगेच जेसीबी मशीनच्या साह्याने शिंदेवाडी ते जुना टाकळी खंडेश्वरी रस्ता हा खुला करण्यात आला. यामुळे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अतिशय अशक्यप्राय रस्ता खुला केल्यामुळे प्रवीण घुले व नगरसेवक प्रा. सतीश पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी कर्जत येथील तलाठी प्रशांत जमदाडे, महेश शिंदे, धुळाजी केसकर, ऍड. ऋषिकेश पाटील, माजी सरपंच चंद्रकांत तोरडमल, बापूसाहेब तोरडमल, माजी उपसरपंच निकेश तोरडमल, सागर नलावडे सुरेश क्षीरसागर, पोपटराव क्षीरसागर, बापूराव तोरडमल, अडबंग तोरडमल, विजय तोरडमल, सुभाष तोरडमल, बापूराव तोरडमल, परशुराम तोरडमल, प्रल्हाद तोरडमल उपस्थित होते.