
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे हिंसाचार उसळला. मोदींच्या स्वागताच्या सजावटींची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन जणांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली होती. त्या निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागले.
रविवारी दुपारी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी कुकि-झो या आदिवासी समाज बहुल असलेल्या चुराचांदपूर शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि त्या दोघांच्या सुटकेची मागणी केली. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने चुराचांदपूर पोलिस ठाण्यात घुसण्याचाही प्रयत्न केला. दुपारच्या दृश्यांमध्ये निदर्शनादरम्यान जमावाने कार्यरत जवानांवर दगडफेक केल्याचेही दिसून आले.
ड्युटी मॅजिस्ट्रेटने जामिनासाठी सुनावणी घेतली आणि त्या दोघांची सुटका त्याच दिवशी संध्याकाळी करण्यात आली.,जमावाने पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी लाठीचार्ज करून तो प्रयत्न हाणून पाडला. पोलीस आणि प्रशासनाने निदर्शकांना सांगितले की दोघांची सुटका कायदेशीर मार्गानेच होई. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. ड्युटी मॅजिस्ट्रेटने सुनावणी घेऊन संध्याकाळी दोघांना जामीन मंजूर केला. त्यानंतर परिस्थिती शांत झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्या दोघांच्या अटकेला कारणीभूत ठरलेली घटना गुरुवारी रात्री घडली होती. काही स्थानिक नागरिक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला होता. पोलिसांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या सजावटींची तोडफोड करून पिअरसनमुन परिसरात जाळपोळ करणाऱ्या एका गटाला हटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा संघर्ष उफाळून आला.
त्या रात्रीनंतर तणाव हळूहळू कमी झाला होता. शहरातील विविध सामाजिक संस्थांनी त्या प्रकाराचा निषेध करून मोदींच्या भेटीपूर्वी शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले होते. शनिवारी मोदींच्या भेटीच्या दिवशी कोणताही प्रकार घडला नाही आणि दिवस शांततेत पार पडला.