ट्रम्पने H1-B व्हिसावर वाढवले शुल्क, हिंदुस्थानींची अमेरिकेत पोहोचण्यासाठी एकच झुंबड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1-B व्हिसाचे शुल्क थेट 80 लाखांवर नेल्याने अमेरिकेतील कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेत काम करणाऱ्या हिंदुस्थानींची अमेरिकेत जाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले की हिंदुस्थानी नागरिकांनी, ज्या विमानांमध्ये ते बसले होते (सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर), त्यातून उतरून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण यश आले नाही. प्रमुख ट्रॅव्हल एजंट्सनी सांगितले की शनिवारी आणि रविवारी सकाळी हिंदुस्थानातून अमेरिकेकडे जाणाऱ्या 9 नॉन-स्टॉप फ्लाइट्स (7 एअर इंडिया, 1 युनायटेड आणि 1 अमेरिकन एअरलाइन्स) जवळजवळ पूर्णपणे बुक झाल्या होत्या.

सध्या हिंदुस्थानात असलेले H-1B व्हिसा धारक अमेरिकेत परत जाण्यासाठी धडपड करत असल्याने, शनिवार रात्री दिल्ली-न्यूयॉर्क या फ्लाइटचे एका मार्गाचे इकॉनॉमी तिकीट शनिवारी दुपारी 1.05 लाख रुपयांना विकले जात होते.

संध्याकाळपर्यंत अमेरिकन एअरलाइन्सची AA 293 हीच एकमेव फ्लाइट शिल्लक राहिली होती, जी शनिवार रात्री 11.30 वाजता दिल्लीहून निघून रविवार सकाळी 6.05 वाजता न्यूयॉर्कला पोहोचणार होती. अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या H-1B आणि H-4 व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेत परतण्याचा सल्ला दिला. तसेच अमेरिकेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या तिथेच थांबावे, असेही सांगितले.

‘एक्स’ युजर कौस्तव मजूमदार यांनी आपल्या हँडलवर लिहिलंय की. बंगालमधून दुर्गा पूजेसाठी येणाऱ्या हिंदुस्थानींनी भरलेली आंतरराष्ट्रीय फ्लाइट सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून निघण्याच्या तयारीत असताना H-1B व्हिसाच्या नव्या नियमांची बातमी आली. विमानातील असलेले हिंदुस्थानी प्रवासी घाबरले, विमानातून उतरण्यासाठी विनवण्या केल्या, पण दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.”

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कुटुंबीय तिकिट खिडक्यांवर रांगेत उभे होते. त्यापैकी सॉफ्टवेअर इंजीनीअर अर्जुन वर्मा म्हणाले. की मी मागील सहा तासांपासून सतत एअरलाइन्स आणि एजंट्सना फोन करत आहे, पण सर्व सीट्स संपल्या आहेत किंवा प्रचंड महाग आहेत. मला एका इकॉनॉमी तिकिटासाठी 2.7 लाख रुपये मोजावे लागत आहेत आणि मी 21 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे मी काय करणार आहे हेच मला समजत नाही असे वर्मा म्हणाले.

एका डेटा अॅनालिस्टने सांगितले की, बंगळुरूमधील कॉर्पोरेट कर्मचारीही घाबरले होते. माझ्या मॅनेजरने मला तातडीचा संदेश पाठवला: लगेच फ्लाइट पकडा, नाहीतर 1 लाख डॉलर्स व्हिसा फी भरावी लागेल,” 28 तासांच्या आत आपले आयुष्य कसे आवरायचे असे या अॅनालिस्टने सांगितले

ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष अनिल कंलसी म्हणाले: शनिवार आणि रविवारी सकाळच्या सर्व नॉन-स्टॉप फ्लाइट्स जवळजवळ पूर्णपणे बुक झाल्या आहेत. परिस्थिती सध्या खूपच बदलली आहे. अमेरिकेत असलेल्या H-1B धारकांना तिथेच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि हिंदुस्थानात असलेल्या लोकांनी मुदतपूर्वी अमेरिकेत पोहोचणे किंवा कंपन्यांना फी भरणे, यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. दिवाळी व सणासुदीच्या काळातील हिंदुस्थानावर होणाऱ्या प्रवासावर याचा मोठा परिणाम होईल.

सध्या एअर इंडिया दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून न्यूयॉर्क, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को या मार्गांवर आठवड्याला 80 नॉन-स्टॉप फ्लाइट्स चालवते. 1 सप्टेंबरपासून दिल्ली-वॉशिंग्टन मार्ग निलंबित करण्यात आला आहे. युनायटेड आणि अमेरिकन एअरलाइन्स दररोज एक दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइट चालवतात. डेल्टा एअरलाइन्सने मार्च 2020 नंतर अजूनही हिंदुस्थानातील फ्लाइट्स पुन्हा सुरू केलेल्या नाहीत.