
इराण आणि अमेरिकेतील युद्धजन्य परिस्थितीला दोन आठवडे उलटल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत इराणवर कडक शब्दांत टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक इराणी जनतेचे कौतुक करण्यास सुरुवात केली असून, “इराणी लोक अतिशय बुद्धिमान आणि स्मार्ट आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
पत्रकारांशी संवाद सोडताना ट्रम्प म्हणाले आहेत की, “लोकांना समजत नाहीये, हा अत्यंत उच्च पातळीवरचा बुद्धिबळाचा खेळ आहे. हा खूप हाय-लेव्हलचा बुद्धिबळ खेळ आहे. माझ्या समोरचे खेळाडू खूप स्मार्ट आहेत. हे लोक हुशार आहेत. जेव्हा तुम्ही अशा लोकांशी व्यवहार करता, तेव्हा तुम्ही अतिशय चाणाक्ष आणि खूप हाय आयक्यू (IQ) असलेल्या लोकांशी व्यवहार करत असता. हे लोक खूप स्मार्ट आहेत. तसेच ते अत्यंत हिंसक आणि धूर्त लोक आहेत. यातले काही लोक खूप चांगले आहेत, पण ते हिंसक आहेत.”
दरम्यान, अमेरिका, इस्रायलच्या सतत हल्ल्यानंतरही इराण पराभव मानायला तयार नाही. याउलट इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांवर आश्चर्य व्यक्त केले असून अशा हल्ल्यांची अपेक्षा नव्हती, असे म्हटले आहे.


























































