आली रे आली ठाण्यात मेट्रो आली! ट्रायल रनसाठी सज्ज; क्रेनने डबे ट्रॅकवर उतरवले

गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोकडे डोळे लावून बसलेल्या ठाणेकरांना गणपती बाप्पा पावला आहे. त्यांची मेट्रो रेल्वे प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. सप्टेंबर महिन्यात मेट्रो लाईन 4 आणि 4 अ या मार्गांवरील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन घेण्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. या ट्रायल रनसाठी ठाण्यातील दहा स्थानकांवरील काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी आज मेट्रोचे डबे क्रेनने उचलून ट्रकवर ठेवण्यात आले.

गेल्या आठ वर्षांपासून ठाणे शहरात मेट्रो रेल्वेसाठी ट्रक उभारणीचे काम सुरू आहे. 2022पर्यंत ही मेट्रो रेल्वे धावेल अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु डेडलाईन अनेक वेळा हुकली. मात्र आता या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये ट्रायल रन घेण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

  • कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या साडेदहा किमी मार्गावर दहा स्थानकांदरम्यान या मेट्रोची ट्रायल रन होणार आहे.

ही आहेत स्थानके…

  • कॅडबरी
  • माजिवडा
  • कापूरबावडी
  • मानपाडा
  • टिकुजिनीवाडी
  • डोंगरीपाडा
  • विजय गार्डन
  • कासारवडवली
  • गोवा निवाडा
  • गायमुख

ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप आणि घोडबंदरकडे जाणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. रोजच्या वाहतूककोंडीचा चक्रव्यूह संपेल, अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करत आहेत.