
अहिल्यानगर महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दीपाली बारस्कर, तर उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
अहिल्यानगर महानगरपालिका स्थायी समिती, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदांची निवडणूक मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी नूतन पदाधिकाऱयांचा सत्कार केला. कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहरे, बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, मनोज दुल्हम, संध्या पवार, वंदना ताठे, गौरी बोरकर, , मीनाताई चोपडा, पूर्णिमा गव्हाळे, सोनाबाई शिंदे, नवनाथ कातोरे, सुनीता भिंगारदिवे, अनिता शेटीया, काजल भोसले, सुनीता कांबळे, अश्विनी लोंढे, शीतल ढोणे, पुष्पाताई बोरुडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, प्रकाश भागानगरे, महेश तवले, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, रोहन सानप, महेश लोंढे, सतीश शिंदे, सतीश बारस्कर आदी सदस्य उपस्थित होते.
सुभाष लोंढे म्हणाले, प्रशासनाच्या काळात शहरातील घरांचे सर्वेक्षण तसेच पाणीपट्टी वाढीबाबत पुनर्विचार केला जाईल. प्रलंबित प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील काही नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्थायी समिती सदस्यांना सोबत घेऊन शहर विकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जाईल.
महिला व बालकल्याणच्या सभापती दीपाली बारस्कर म्हणाल्या की, शहरातील महिलांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे, यासाठी योगा क्लास सुरू केले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाईल, तसेच शहरात विविध ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा मानस आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवर सुसज्ज अंगणवाडी इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात येईल.



























































