
जायकवाडीत काल दुपारी 2 वाजता उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के झाला. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांना जायकवाडीला पाणी सोडण्याचा प्रश्न मिटला आहे. यावर्षी विक्रमी वेळेत म्हणजे 9 जुलै 2025 रोजी जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी झाला आहे. जायकवाडीची एकूण पाणी साठवण क्षमता 102.65 टीएमसी असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 76.65 टीएमसी आहे. मागील वर्षी या तारखेला उपयुक्त पाणीसाठा फक्त 4.5 टक्के होता. या पार्श्वभूमीवर समन्यायी कायद्यानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे.
गेल्या सलग सात वर्षांत 2023चा अपवाद वगळता समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही. यापूर्वी 2012 पासून 2025 पर्यंतच्या 14 वर्षांत 2012, 2013, 2014, 2015, 2018 आणि 2023 मध्ये पाणी सोडण्यात आले होते. घाटमाथ्यावर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 1 जूनपासून आजपर्यंत जवळपास पाचपट पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या पूर्वार्धात जायकवाडीकडे मोठय़ा प्रमाणात पाणी गेले. गोदावरी नदीत नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावरून 28 टीएमसी तसेच प्रवरा नदीत ओझर बंधाऱ्यावरून 3 टीएमसी असे एकूण 31 टीएमसी पाणी आजपर्यंत वाहून गेले आहे. सध्या नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावरून 32,690 क्युसेक, तसेच ओझर बंधाऱ्यावरून 12,613 क्युसेक प्रवाह वाहत आहे. गोदावरी नदीतील कमालपूर बंधाऱ्यातून 38,737 क्युसेक तसेच प्रवरा नदीतील मध्यमेश्वर (नेवासा) बंधाऱ्यातून 17,042 असे एकूण 55,779 क्युसेक पाण्याची जायकवाडी धरणात आवक होत आहे.
जायकवाडीत चोवीस तासांत सरासरी 4 टीएमसी पाणी येत आहे. आजमितीला नाशिकमधील धरणात 71 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, मागील वर्षी तो फक्त 13 टक्के होता. धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने तयार केलेल्या धरण जलाशय परिचालन सूचीनुसार दर महिन्याच्या प्रत्येक पंधरवडय़ात एकूण क्षमतेच्या अपेक्षित टक्के असलेला पाणीसाठा धरणात साठवून ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जलाशय परिचालन सूचीनुसार जायकवाडी धरणातून येत्या आठ/दहा दिवसांत गोदावरी नदीत पाणी सोडावे लागेल.
दरम्यान, काल सायंकाळीच्या आकडेवारीनुसार जायकवाडी जलाशयात 57360 क्युसेकने आवक होत होती. या धरणात 66.39 टक्के पाणीसाठा झाला होता. यात उपयुक्त साठा 50.91 टीएमसी, तर उपयुक्तसह मृतसाठा 76.98 टीएमसी इतका झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांचे विसर्ग घटविण्यात आले आहेत. त्यामुळे काल सायंकाळी सहा वाजता नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 12620 क्युसेकने विसर्ग सुरू होता.
समन्यायी कायद्यानुसार यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय संपला आहे. घाटमाथ्यावर मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट पाऊस झाला असला तरी घाटमाथा परिसर वगळता अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत फक्त 40 टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला असून, त्यावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आता पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्याने गोदावरी, निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्याची आवश्यकता आहे.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता.