
सुट्टीसाठी गावी येत असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा मृतदेह कोलकात्यातील खरगपूर परिसरात रेल्वेमार्गाशेजारी आढळून आला. हा अपघात आहे की घातपात, याचा शोध सैन्य दलाचे पथक व पश्चिम बंगाल पोलीस घेत आहेत.
ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय 37, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे जवानाचे नाव आहे. ते 15 जुलै रोजी रात्री अहिल्यानगरकडे येण्यासाठी निघाले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर थेट आठव्या दिवशी 22 जुलैला सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
जवान ज्ञानदेव अंभोरे हे कोलकाता येथील लष्करी तळावर पायोनियर आर्मी युनिट-1803मध्ये हवालदार या पदावर नियुक्तीस होते. जवान ज्ञानदेव हे सन 2004मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी जवळपास 21 वर्षे देशसेवा केली आहे. एक-दोन वर्षांत ते निवृत्त होणार होते. 15 जुलै रोजी ते सुट्टी घेऊन गावी येण्यास निघाले होते. रात्री 9च्या सुमारास त्यांनी पत्नीला फोन करून आपण हावडा रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 16 जुलैला त्यांच्या पत्नीने त्यांना मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्यांनी दिवसभर फोन उचलला नाही. 17 जुलैला फोन बंद लागला. अनेकदा फोन करूनही संपर्क न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोलकाता येथील त्यांच्या युनिटच्या कार्यालयात फोन करून माहिती दिली.
सैन्य दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरू करीत कुटुंबीयांना कोलकात्याला बोलावून घेतले. अहिल्यानगरहून त्यांचे बंधू व इतर नातेवाईक कोलकात्याला गेले. शोधमोहीम राबवीत असताना या कालावधीत त्या परिसरात झालेल्या रेल्वे अपघातांतील बेवारस मृतदेह कुटुंबीयांना दाखविण्यात आले. त्यातील कोलकात्याच्या पुढे खरगपूर परिसरात 16 जुलै रोजी सकाळी आढळून आलेला मृतदेह ज्ञानदेव अंभोरे यांचाच असल्याचे 22 जुलै रोजी सायंकाळी निदर्शनास आले.
त्यानंतर तेथील सायबर पोलिसांनी अंभोरे यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता, ते महाराष्ट्रात आढळले. तसेच पुणे रेल्वे स्थानकात हावडा ते पुणे आलेल्या ‘आझाद हिंद एक्स्प्रेस’मध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. ती बॅग जवान अंभोरे यांचीच असल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्याजवळ असलेली दुसरी बॅग, ज्यात त्यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे होती, ती गायब झाली आहे. अंभोरे यांचा रेल्वेगाडीतून पडून अपघात झाला की लुटीच्या उद्देशाने त्यांना कोणी रेल्वेगाडीतून खाली ढकलले, याचा शोध सैन्य दलाचे पथक व पश्चिम बंगाल पोलीस घेत आहेत.