
मी वनखात्याचा मंत्री आहे; पण बदनाम होण्यासाठीच मी खात्याचा मंत्री झालो आहे का? असा उद्विग्न सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. बिबट्याच्या नसबंदीसंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पकडलेले बिबटे वनतारा येथे नेण्यात येणार आहेत. आफ्रिकेतही बिबटे पाठवण्याचा विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या रोहन बोंबे, शिवण्या बोंबे यांच्या कुटुंबीयांची वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी भेट घेत सांत्वन केले.
गणेश नाईक म्हणाले, परिसरात बिबट्या असल्यास दोन ते चार किलोमीटरपर्यंत सायरन वाजणारी यंत्रणा या भागात बसविण्यात येईल. वन विभागाच्या वतीने पहिल्या टप्यात वीस बिबटे वनतारा गुजरात जंगलात पाठवले असून, आफ्रिकन देशांनी बिबट्यांची मागणी केल्यास केंद्र सरकारच्या परवानगीने तेही त्यांना देण्यात येईल. तसेच या भागातील शेतकऱ्यांना शेतीला व उसाला पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
शिरूर तालुक्यात सोयरीक करण्यासाठी नकार दिला जात असल्याने मुलांचे लग्न होत नसल्याची कबुली देऊन नाईक यांनी दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीला पुष्टी दिली. बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले. त्यावेळी दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येतील, असेही नाईक म्हणाले.
बिबट्यांना पकडण्यासाठी १२०० पिंजरे
चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी वापरण्यात आलेले सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुणे आणि नगर जिल्ह्यांत बिबट्यांसाठी वापरण्यात येणार आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरिता प्रत्येकी ११ कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय, बिबट्यांना पकडण्यासाठी १२०० पिंजरे कार्यान्वित केले जातील, अशी माहिती नाईक यांनी दिली.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम, माजी आमदार पोपटराव गावडे, आशाताई बुचके. गणेश कवडे, शंकरशेठ पिंगळे, विजय पवार, माऊली ढोमे, नरेंद्र ढोमे, जितेंद्र रामगावकर, प्रशांत खाडे, शरद बोंबे आदी उपस्थित होते.





























































