
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प सभेत शनिवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानांमुळे आधीपासूनच वादात असलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच संतप्त नगरसेवक आक्रमक झाले. ‘जो शिवरायांचा अपमान करतो, त्याला सभागृहात बोलू देणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडत छिंदमला बाहेर हुसकावून लावले.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. सादर होणारे बजेट अधिकृत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत छिंदमने प्रशासनावर निशाणा साधला. महानगरपालिकेत प्रभारी राज सुरू असून वित्त विभागासह अनेक जबाबदाऱ्या एकाच अधिकाऱ्याकडे असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अधिकृत अधिकारी नसताना बजेट नेमके कोणी तयार केले? असा जाब छिदमने प्रशासनाला विचारला. यानंतर सभागृहातील वातावरण तापले आणि नगरसेवकांनी छिंदमला रोखले. त्यानंतर अचानक जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणा सुरू झाल्या आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
मी निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, असा आग्रह छिंदमने धरला. मात्र आक्रमक नगरसेवकांनी शिवरायांचा अपमान करणाऱ्याला येथे स्थान नाही, असे म्हणत त्यांच्याभोवती गर्दी केली. वाद चिघळत असताना छिंदमच्या समोरील माईक तोडण्यात आला. अखेर संतप्त नगरसेवकांनी छिंदमला सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले.


































































