
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय उत्तम फुंदे याला पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली होती. तसेच गुरुवारी (7 ऑगस्ट 2025) या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी या आधीच अटक केली होती. या सर्व आरोपींना अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर फुंदे याला न्यायालयाने येत्या 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतर चार आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणाची गंभिर दखल घेत जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी फुंदे याला तात्काळ निलंबित केले. 1 ऑगस्ट रोजी फुंदे याने वर्गात असलेल्या सात वर्षीय मुलीवर लैंगिग अत्याचार केला होता. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडित मुलीच्या कुटुंबावर आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण यांनी मदत केली होती. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी मोठे प्रयत्न झाले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी, पूजा दहातोंडे, शाहीन शेख, एड हरिहर गर्जे, किसन आव्हाड यांनी मुलीच्या कुटुंबाला आधार देत हे प्रकरण उघडकीस आणल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.
शुक्रवारी सर्व आरोपींना अहिल्यानगर येथील न्यायालयात हजर केले असता विशेष जलदगती बालविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांनी फुंदे याला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उर्वरित चार आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फुंदे याच्या वतीने एड नागरगोजे यांनी तर उर्वरित चार आरोपींच्या वतीने एड सचिन बडे यांनी तर सरकारी वकील म्हणून एड ए डी ढगे यांनी काम पहिले.