
अहिल्यानगर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली रस्त्यांची कामे अद्यापि पूर्ण झाली नाहीत. कोटय़वधी रुपये खर्च करूनसुद्धा रस्त्यांवर फक्त खड्डेच खड्डे दिसत आहेत. शहरातील प्रमुख मार्ग, उपमार्ग आणि वस्ती भागातून प्रवास करणे म्हणजे नागरिकांनी जीव मुठीत धरून चालण्यासारखे झाले आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. एका बाजूला रस्ते उकरून ठेवले असून, महिनोन्महिने कामे अर्धवटच आहेत. परिणामी, वाहनचालकांचे हाल सुरूच असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
श्री गणरायाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना अहिल्यानगर शहरातील रस्ते खड्डय़ांनी विदीर्ण झाले आहेत. नागरिकांचा संताप ओसंडून वाहतो आहे. खड्डेमय रस्त्यांतून गणेशोत्सव कसा पार पाडायचा? सणासुदीच्या काळात वाहतुकीत होणारी वाढ, मंडळांची रॅली, भाविकांची गर्दी या सगळ्यामुळे शहर ठप्प होणार, वाहतूककोंडी आणि अपघातांची मालिका होणार, यात शंका नाही.
अहिल्यानगर मनपा इमारतीजवळील प्रमुख रस्ता, सावेडी ते माळीवाडा चौक, टिळक रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टेशन रोड, तसेच उपनगरीय भागांतील रस्ते खड्डय़ांनी पोखरलेले आहेत. पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये पाणी साचून वाहनचालकांचे होणारे हाल मर्यादेपलीकडे गेले आहेत. दुचाकीस्वारांना दररोज अपघातांचा धोका पत्करावा लागतो.
रस्त्यांत खड्डे की खड्डय़ांत रस्ते?
सणासुदीच्या तोंडावर रस्त्यांची झालेली ही चाळण प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणारी असून, जर तत्काळ रस्त्यांची डागडुजी केली नाही, तर महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शहरवासीयांचे प्रशासनावर ताशेरे
कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, दर्जा नसल्यामुळे काही महिन्यांतच रस्ते उखडतात. रस्त्यांवर कोटय़वधी रुपये खर्च होतात; पण जनतेच्या वाटय़ाला खड्डेच येतात. यात अधिकारी, ठेकेदार आणि सत्ताधारी यांचा मिलीभगतखोर कारभार दिसतो आहे, असे ताशेरे शहरवासीय महापालिका प्रशासनावर ओढले आहेत. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची ही अवस्था धोक्याची घंटा ठरत आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन गाडय़ा यांना या खड्डय़ांतून मार्ग काढणे अशक्य होणार आहे. अशा वेळी जीवितहानी झाली तर सर्व जबाबदारी महापालिकेच्या निक्रिय प्रशासनावरच येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.