
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळले. या दुर्घटनेत 204 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाल्याची माहिती अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या आगीत विमानातील प्रवासी होरपळल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य असल्याने प्रशासनाने डीएनए चाचणीसाठी नमुने देण्याचे आवाहन प्रवाशांच्या नातेवाईकांना करण्यात आले आहे.
अहमदाबाद सिव्हील रुग्णालय प्रशासनाने मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या कसोटी भवनमध्ये ही विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने सर्व पीडित कुटुंबांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना डीएनए चाचणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून मृतदेहांची ओळख लवकर आणि अचूकपणे करता येईल.
या दुर्घटनेत 50 जण जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन माहिती आणि नातेवाईकांना मदत करण्यासाठी दोन हेल्पलाइन नंबर देखील जारी केले आहेत.