Ahmedabad Plane Crash – Air India चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडून दुःख व्यक्त

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठत आहेत. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेबाबत एअर इंडियाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

याबाबत जारी केलेल्या निवेदनात चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की, अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट 171 आज अपघातग्रस्त झाले आहे या घटनेची मी अत्यंत दुःखाने पुष्टी करतो. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सध्या, आमचे प्राथमिक लक्ष सर्व बाधितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यावर आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. याबाबत अधिक माहिती मिळताच ते देण्यात येईल. अपघाताची माहिती देण्यासाठी एक आपत्कालीन केंद्र सुरू करण्यात आले आहे आणि मदत पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली.