
गेले कित्येक वर्षे एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर शिवसेनेमुळे बढती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांना बढती मिळावी यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेनेने शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई आणि कार्याध्यक्ष विलास पोतनीस यांच्या प्रमुख नेतृत्वात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत आणि सहसरचिटणीस प्रवीण शिंदे, बाळासाहेब कांबळे, अमोल कदम यांनी व्यवस्थापनाकडे हा विषय सातत्याने लावून धरला होता.
एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेनेने सतत पत्रव्यवहार करून अखेर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी भाग पाडले व कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर या बढती प्रक्रियेतून कोणाला वगळण्यात आले असेल तर त्यांच्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहेत. अनेक वर्षांनंतर मिळालेल्या बढतीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कामगारांनी याबद्दल एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
हँडीमॅन कॅटेगारीला शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमोशन द्यावे!
एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती आणि एव्हिएशन कामगार सेना एवढय़ावर थांबली नसून 2004 च्या बॅचच्या हँडीमॅन कॅटेगारीला शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमोशन देण्यात यावे यासाठी व्यवस्थापनाची भेट घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पगारवाढीचा मुद्दादेखील एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती व एव्हिएशन कामगार सेना युनियच्या माध्यमातून मांडणार आहे.




























































