
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या डेटा सेंटर्समुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत असल्याची माहिती केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आली आहे. ज्या परिसरात एआय डेटा सेंटर्स कार्यरत आहेत. त्या ठिकाणचे तापमान सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ असे नाव दिले आहे. संशोधकांनी गेल्या दोन दशकांतील सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे.
पृथ्वीवरील एखाद्या परिसरात एआय डेटा सेंटर कार्यान्वित झाले आहे. त्याच क्षणी तेथील तापमान अचानक वाढायला सुरुवात होते, असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. डेटा सेंटरजवळ तापमान सरासरी 2.07 अंश सेल्सिअसने वाढले आहे. काही ठिकाणी वाढलेले तापमान 9.1 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. याचा परिणाम केवळ डेटा सेंटरच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. तर एआय सेंटरपासून 10 किलोमीटरच्या परिसरातही तापमानात वाढ झालेली दिसून आली आहे. एआय डेटा सेंटर्समधून बाहेर पडणारी अतिरिक्त उष्णता त्यांच्या आसपासच्या स्थानिक वातावरणाचे तापमान वाढवते. बहुतेक एआय इन्फ्रास्ट्रक्चर जीवाश्म इंधनावर म्हणजेच पेट्रोल-डिझेल, कोळसा आणि नैसर्गिक वायू इत्यादींवर चालणाऱ्या विजेवर अवलंबून आहे, ज्यामुळे उष्णता आणि प्रदूषण दोन्ही वाढत आहेत.
जगभरात 2.34 कोटी लोकांवर परिणाम
या अभ्यासानुसार, जगभरात जवळपास 2.34 लाख अशा भागांमध्ये राहतात ज्या भागात डेटा सेंटर्समुळे उष्णता वाढली आहे. अनेक डेटा सेंटर्स शहरांपासून दूर बांधले गेले आहेत. तरीही त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी स्पेनमधील अॅरागॉन, मेक्सिकोमधील बाहियो आणि ब्राझीलमधील ईशान्येकडील प्रदेशात केस स्टडी केली. येथे डेटा सेंटर्सचे क्लस्टर (समूह) आहेत. येथील तापमानात असामान्य वाढ दिसून आली आहे. उष्णतेसोबत कार्बन उत्सर्जनही वेगाने वाढले आहे.



























































