इंडियन सुपर लीगची शिट्टी वाजणार!

हिंदुस्थानी फुटबॉलच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या दीर्घकालीन संभ्रमावर अखेर दिलासादायक पडदा पडणार आहे. अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन सुपर लीगबाबत (आयएसएल) अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आयएसएलची शिट्टी वाजणार असल्याचे सांगितले. आयएसएलच्या पुढील हंगामाची सुरुवात कधी होणार याची अधिकृत तारीख पुढील आठवडय़ात जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. आपत्कालीन बैठकीनंतर घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे केवळ एका स्पर्धेचा नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानी फुटबॉल व्यवस्थेचा श्वास मोकळा करणारा टप्पा मानला जात आहे.

शनिवारी पार पडलेल्या आपत्कालीन बैठकीत एआयएफएफ पदाधिकाऱयांनी एआयएफएफ-आयएसएल समन्वय समितीने सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा केली. ही समिती 20 डिसेंबर 2025 रोजी महासंघाच्या कार्यकारिणी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर स्थापन करण्यात आली होती. समितीला 2 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते आणि अहवाल वेळेत प्राप्त झाल्यानंतर पदाधिकाऱयांनी तो औपचारिकरीत्या मान्य केला.

या अहवालातील सर्वात निर्णायक शिफारस म्हणजे इंडियन सुपर लीगचे आयोजन आणि संचालन थेट अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने करावे. त्यानुसार एआयएफएफने स्पष्ट केले आहे की, लीगच्या संचलनाची संपूर्ण जबाबदारी महासंघ स्वीकारणार असून हंगाम सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर होईल.