
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर ए- 350 ला रनवेवर एका बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या धडकेत विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाच्या ए 350 विमानाने उड्डाण केले, परंतु इराणी हवाई क्षेत्र बंद असल्याने दिल्लीला परतावे लागले. दिल्लीत उतरल्यानंतर दाट धुक्यात विमान धावपट्टीवरून जात असताना एका कंटेनरने त्याच्या उजव्या इंजिनला धडक दिली. या घटनेत विमानाच्या इंजिनचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. या घटनेनंतर खबरदारी म्हणून संबंधित विमान तपास व दुरुस्तीसाठी ग्राऊंडेड करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘विमान सध्या सखोल तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी ग्राऊंडेड ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काही मार्गांवरील उड्डाणांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.’ प्रवक्त्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.




























































