
आखाती देशांतील संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवडय़ांत पश्चिम आशियातील सुमारे 2,500 उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ 30 टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱयांना पाठवलेल्या पत्रात दिली.
सीईओ विल्सन यांनी पत्रात म्हटलंय की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे केवळ एअर इंडियाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रावर आर्थिक परिणाम होऊ लागला असून विमान इंधनाचे दर दुपटीने वाढले आहेत. हवाई क्षेत्र आणि विमानतळ बंद असल्याने किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव एअर इंडियाला आपली 70 टक्के उड्डाणे स्थगित करावी लागली आहेत.
कर्मचाऱयांची सुरक्षा महत्त्वाची
कर्मचाऱयांना संबोधित करताना विल्सन म्हणाले की, सध्याची परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. जे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभावित क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्या आव्हानांची कंपनीला जाणीव आहे. ‘आमची टीम परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार बदल करत आहे. सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तिकीट दरवाढीचे संकेत
विमानांच्या इंधनाचे दर दुपटीहून अधिक वाढले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका पुढील महिन्यापासून बसण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी विमान कंपनीने नवीन तिकिटांवर ‘फ्युएल सरचार्ज’ (इंधन अधिभार) लागू केला आहे. ब्रिटन, युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने आधीच लांबच्या मार्गाने जात होती. आता त्यात आणखी बदल करून ती अधिक लांबून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही जास्त लागत आहे. प्रत्येक ग्राहक वाढीव भाडे देण्यास तयार नसतो. त्यामुळे मागणी घटण्यापूर्वी आम्ही भाडे किती वाढवू शकतो याला एक मर्यादा आहे, असेही विल्सन यांनी स्पष्ट केले आहे.

























































