लँडिंगवेळी चाक निखळलं, 133 प्रवाशांचा जीव टांगणीला; एअर इंडियाच्या विमानाचा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघाताचा सामना करावा लागला. हैदराबादवरून फुकेतकडे निघालेल्या या विमानाच्या चाकाचे लँडिंगच्या वेळी तुकडे तुकडे झाले, मात्र वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे विमानातील सर्व 133 प्रवासी आणि सात क्रू मेंबर्स सुखरूप बचावले आहेत. बुधवारी 11 मार्च रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, विमानाचे ‘हार्ड लँडिंग’ झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसचे IX938 हे विमान हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांना घेऊन थायलंडसाठी रवाना झाले होते. बुधवारी सकाळी 11.24 च्या सुमारास हे विमान फुकेत विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवर जोरात आदळले. यावेळी विमानाचे समोरील चाक पूर्णपणे निखळून त्याचे तुकडे झाले. विमानाचा वेग आणि चाक तुटल्याचा जोरदार आवाज झाल्यामुळे विमानात बसलेले प्रवासी प्रचंड घाबरले होते. चाक निखळल्यानंतरही विमान काही अंतर धावपट्टीवर घासले गेले, ज्यामुळे धावपट्टीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, वैमानिकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली.

या घटनेनंतर फुकेत विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली करत धावपट्टी दुपारी 12.08 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात अपघातग्रस्त विमान धावपट्टीवरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. विमानात दोन लहान मुलांसह एकूण 133 प्रवासी होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञांचे एक पथक तपासासाठी फुकेतकडे रवाना झाले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विमानाचे लँडिंग सुनिश्चित करण्यात आले. विमान सध्या तांत्रिक तपासणीसाठी फुकेतमध्येच थांबवून ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांच्या देखभालीबाबत आणि सुरक्षेच्या नियमांबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.