
अहमदाबाद भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. प्राथमिक अहवालानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एअर इंडियाला त्यांच्या विमानांची कसून तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग 787 आणि बोईंग 737 विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विचच्या लॉकिंग यंत्रणेची तपासणी पूर्ण केली आहे. यामध्ये कोणताही दोष आढळला नसल्याचे एअर इंडियाकडून आता सांगण्यात आलंय. एअरलाइनने 14 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या डीजीसीएच्या सूचनांचे पालन केल्याचे सांगितले.
एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा उड्डाणानंतर अवघ्या तीन सेकंदांत थांबला. फ्युएल कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वैमानिकांना टेकऑफ करता आले नाही व अपघात झाल्याचे अहवालात म्हटले होते.
एअर इंडियाने डीसीएच्या आदेशानुसार आता एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 व बोईंग 737 विमानांमधील फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी केली. एअरलाइन्सने 12 जुलै रोजी स्वतःहून बोईंग फ्लाईटच्या फ्युएल सिस्टमची तपासणी सुरू केली होती. प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी ते पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे एअर इंडियाने म्हटले.