
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने 23 मे पर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचा परिणाम हिंदुस्थानातील विमानांवरही दिसून येतो. याबाबत एअर इंडियाने केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, विमान कंपनीला 12 महिन्यांत सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असे एअर इंडियाने पत्रात म्हटले आहे.
वाढता इंधन खर्च आणि प्रवासाला लागणारा जास्त वेळ यामुळे हिंदुस्थानातील विमान कंपन्यांवर परिणाम होत आहे. विमान कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने सरकारकडून प्रमाणित अनुदानाची मागणी केली आहे. एअर इंडियाने विमान वाहतूक मंत्रालयाला दिलेल्या पत्राचा हवाला देत असे रॉयटर्सने आपल्या वृत्तात ही माहिती दिली.
प्रभावित आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी अनुदान हा एक चांगला, पडताळणीयोग्य आणि न्याय्य पर्याय आहे. परिस्थिती सुधारल्यावर अनुदान बंद करता येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.