पावसामुळे एअर इंडियाची उड्डाणे रद्द; प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत मिळणार

मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमानसेवाही कोलमडून गेली आहे. जवळपास सर्वच विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उड्डाणे रद्द केली. एअर इंडियानेही अनेक उड्डाणे रद्द करावी लागत असल्याचे जाहीर केले. तसेच काही विमानांच्या मार्गात बदल केला. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रद्द झालेल्या विमान प्रवासाच्या बुकिंगचे पैसे प्रवाशांना रिफंड करणार असल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

एअर इंडियाची ‘एक्स’ अकाऊंटवरील पोस्ट

‘मुंबईतील मुसळधार पावसामुळे उड्डाण संचालनावर परिणाम होत आहे. परिणामी काही उड्डाणे रद्द, तर काहींचे मार्ग वळवण्यात येत आहेत. एअर इंडिया 25 जुलैच्या प्रवासासाठी कन्फर्म बुकिंग झालेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार आहे. बुकिंगच्या पैशांचा पूर्ण परतावा किंवा एक वेळचे मोफत रिशेड्युलिंग ऑफर करीत आहोत’, असे एअर इंडियाने आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत एक लिंकदेखील शेअर केली आहे.

मुसळधार पावसाने मुंबई शहर व उपनगरांसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे कोलमडलेली विमानसेवा पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.