
पाच वर्षांपूर्वी कोविड महामारीचे जगासमोर सर्वात मोठे आरोग्य संकट होते. आता कोविडची साथ नसली तरी हिंदुस्थानात हवा प्रदूषण हे कोविड महामारीनंतर सर्वात मोठे आरोग्य संकट बनले आहे. ब्रिटनमध्ये काम करणाऱया हिंदुस्थानातील अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी हा दावा केला आहे. जर तातडीने आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर ही समस्या दरवर्षी अधिक गंभीर होत जाईल, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
डॉक्टरांच्या मते, श्वासोच्छ्वासाशी संबंधित आजारांचा एक मोठा भाग अजूनही निदान आणि उपचारांशिवाय आहे. डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत केवळ लठ्ठपणामुळे हृदयरोगांची प्रकरणे वाढलेली नाहीत. हृदयरोगांचे एक मोठे कारण प्रदूषणदेखील आहे. यात कार आणि विमानांमधून निघणाऱया विषारी वायूंचाही समावेश आहे, जो हिंदुस्थान, ब्रिटन आणि इतर देशांमधील शहरांमध्ये वेगाने वाढला आहे.
उपाय शोधण्यात खूपच उशीर
इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे असलेले कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट आणि हिंदुस्थान सरकारच्या कोविड-19 सल्लागार समितीचे माजी सदस्य मनीष गौतम यांनी सांगितले की, वायू प्रदूषणावर सरकारचे नवीन लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, परंतु यात खूप उशीर झाला आहे. उत्तर हिंदुस्थानात राहणाऱया लाखो लोकांमध्ये नुकसान आधीच झाले आहे. जे उपचार होत आहेत, ते समस्येचा फक्त एक छोटा भाग आहे.






























































