
दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवर नेहमी वाहतूक काेंडी पाहायला मिळतेय. परंतु, लवकरच या वाहतूक काेंडीपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कारण, लवकरच या ठिकाणी इंडिगोच्या मालकीची कंपनी इंटरग्लोब इंटरप्रायझेस आणि आर्चर एविएशन मिळून भारत एअर टॅक्सी (एअर टॅक्सी) सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर नोएडा ते गुरुग्रामचा प्रवास अडीच तासांवरून केवळ अर्ध्या तासांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो.
या एअर टॅक्सीला मिडनाईट असे नाव देण्यात आले आहे. ही एक इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग विमान आहे. यात पायलटशिवाय आणखी चार प्रवासी बसू शकतात. हे पूर्णपणे विजेवर चालते. त्यामुळे यातून धूर निघत नाही. किंवा हेलिकाॅप्टरसारखा आवाज येत नाही. रस्त्यावरून 90 ते 120 मिनिटे लागतात. त्याच मार्गावर एअर टॅक्सीने केवळ 27 ते 30 मिनिटे लागू शकतात. हिंदुस्थानात ही क्रांतिकारक सेवा 2026 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. काही महिन्यात याची चाचणी पूर्ण केल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. सध्या नागरिक उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीए सोबत मिळून एअर काॅरिडोल म्हणजेच हवाई रस्ते अंतिम करण्यावर काम सुरू आहे. या एअर टॅक्सीचे भाडेसुद्धा जास्त महाग नसणार आहे. आर्चर एव्हिएशनच्या माहितीनुसार, नोएडा ते गुरुग्रामसाठी एका प्रवाशाला 2 हजार ते 3 हजार रुपये मोजावे लागू शकतात. हे भाडे उबर किंवा ओलाच्या प्रीमियर कॅबएवढे ठेवण्यात आले आहे. एअर टॅक्सीने प्रवास केल्यास याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशाचा 80 टक्के वेळ वाचू शकतो.
कॅब बुक करण्याइतके सोपे
ज्याप्रमाणे हेलिकाॅप्टरसाठी हेलीपॅड बनवले जातात. त्याचप्रमाणे या एअर टॅक्सीसाठी व्हर्टीपोर्ट बनवले जातील. नोएडा एक्सप्रेसवे जवळ स्टेशन बनवले जाऊ शकते. गुरुग्रामच्या सायबर हब किंवा गोल्फ कोर्स रोडजवळ व्हर्टीपोर्ट बनवले जाऊ शकते. तर दिल्लीतील कनॉट प्लेस पासू गुरुग्रामसाठी केवळ 7 मिनिटे लागतील. एअर टॅक्सी बुक करणे कॅब बुक करण्याइतके सोपे असेल. इंडिगोच्या अॅप वरून किंवा एका नव्या डेडिकेटेड अॅपवरून सीट बुक करता येऊ शकेल.


























































