शिवडी विधानसभेतील प्रलंबित कामे मार्गी लावा! अजय चौधरी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

शिवडी विधानसभा क्षेत्रात पुनर्बांधणी, पुनर्विकास, नागरी सुविधा निधी त्याचप्रमाणे विविध नागरी विकासकामांसाठी धोरण निश्चित करावे, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

विविध नागरी विकासकामांसंदर्भात पालिका मुख्यालयात अजय चौधरी यांनी गगराणी यांची भेट घेतली. शिवडी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रलंबित कामे आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाली तर रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदन चौधरी यांनी आयुक्तांना दिले. निवेदनात अभुदयनगरमधील इमारत क्रमांक 11 शेजारील आरोग्य पेंद्राची पुनर्बांधणी, आमदार-खासदार यांच्या निधीतून विविध सामाजिक संस्थांना देण्यात आलेल्या वास्तूंवर व्यावसायिक दराने आकारण्यात येणारे मालमत्ता कर कमी करण्यात यावा, भोईवाडा गाव पुनर्विकास, एफ/दक्षिण प्रभाग कार्यालयात नागरिक सुविधांकरिता 2024-25 सालामध्ये निधी उपलब्ध करून द्या, नागरी सुविधांच्या कामांकरिता विविध शासकीय आस्थापनांकडून वाहतूक पोलीस यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास होणाऱ्या विलंबाबाबत योग्य धोरण निश्चित करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.