ग्लोबल रुग्णालयाचा गरिबांच्या खाटांवर डल्ला, आरक्षित खाटा देण्यास दिला नकार; अजय चौधरी यांची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने ग्लोबल रुग्णालयाला वाढीव एफएसआय (FSI) आणि इतर अनेक सवलती दिल्या असतानाही, हे रुग्णालय गरीब रुग्णांसाठी असलेल्या आरक्षित खाटांचा लाभ त्यांना देत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत केला. गेल्या १५ वर्षांपासून या खाटांचा गैरवापर सुरू असून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले.

विधानसभेत बोलताना अजय चौधरी म्हणाले की, “मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारने ग्लोबल रुग्णालयाला वाढीव FSI आणि इतर सवलती दिल्या होत्या. त्या बदल्यात रुग्णालयाने १५ टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक होते, परंतु रुग्णालय या अटींचे पालन करत नाही.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून या आरक्षित खाटांचा गैरवापर होत असून गरिबांकडून जास्त पैसे उकळले जात आहेत. मंत्री महोदय ह्या रुग्णालयाचा करारनामा ताबडतोब करण्याचा आदेश महानगरपालिकेला देणार का? रुग्णालयाने आरक्षित खाटा देण्यास नकार दिल्यास कारवाई करणार का? रुग्णालयाला दिलेल्या सवलती काढून घेणार का?”