अजय देवगणने वाढदिवसानिमित्त स्वतःला दिली खास भेट; ताफ्यात दाखल झाली एवढ्या कोटींची आलिशान मर्सिडीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्यांच्या शाही जीवनशैलीसाठीही ओळखले जातो. 3 एप्रिल रोजी अजय देवगण याने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस अधिक खास बनवण्यासाठी त्याने स्वतःला एक खास भेट दिली आहे. अजय देवगण याने आपल्या कार कलेक्शनमध्ये 1.40 कोटी रुपये किमतीची आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास’ समाविष्ट केली असून त्यांच्या कार संग्रहात आता आणखी एका आलिशान गाडीचा समावेश झाला.

गाड्यांच्या बाबतीत अजय देवगण यांची निवड अतिशय चोखंदळ असल्याचे मानले जाते. त्याच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच रोल्स-रॉइस कलिनान, मर्सिडीज-मेबॅक GLS600, BMW X7 आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक BMW i7 यांसारख्या जगातील सर्वात महागड्या गाड्यांची रांग आहे. आता या नव्या मर्सिडीजच्या समावेशामुळे त्याचा ताफा अधिक शक्तिशाली झाला आहे. मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास ही गाडी तिच्या प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे सेलिब्रिटींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 3,430 मिमीचा मोठा व्हीलबेस असलेली ही कार या सेगमेंटमधील सर्वात आरामदायी गाड्यांपैकी एक आहे. अजय देवगण याच्या व्यतिरिक्त शाहरुख खान आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्याकडेही ही आलिशान कार आहे.

या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यातील मागील सीट्स, ज्यात मसाज, व्हेंटिलेशन आणि हीटिंगची विशेष सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी यात 360-डिग्री कॅमेरा आणि लेन-कीपिंग असिस्ट यांसारखी प्रगत फीचर्स आहेत, तर मनोरंजनासाठी 12.3 इंचाचे मोठे स्क्रीन्स आणि प्रीमियम साउंड सिस्टीम बसवण्यात आली आहे. अजय देवगण यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, चाहते ‘धमाल 4’, ‘दृश्यम 3’ आणि ‘रेंजर’ या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच 2027 मध्ये येणाऱ्या रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल 5’ मध्ये ते अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे.